Monday, January 10, 2011

ये फिक्सिंग है बॉस!!!


  “ये सेट हे बॉस… ऑलरेडी फिक्स आहेत गोष्टी…. सेटींग करुन ठेव ना…. जॅक लागलाय ना नीट? एक्का चिकटवला? ऑल डन?” विचीत्र वाटताएत ना हि वाक्य? अचानक हे काय सुरु झालय असं वाटतय ना? बरोब्बर! असच वाटलं सगळ्यांना जेंव्हा काही दिवसांपूर्वी अचानाक क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या हिमनगाचं टोक पुन्हा दिसू लागलं. या वेळेस पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंना मॅच फिक्सिंग प्रकरणात रंगेहाथ पकडण्यात आलं. पेपरात आणि टिव्ही न्यूज चॅनल्सवर सनसनीखेज बातम्या चालवल्या गेल्या, पाकिस्तानी खेळाडूंना दूषणं दिली गेली. लागोलाग खेळाडूंवर कारवाईही झाली आणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी फिक्सिंग या विषयावर चर्चा सुरु झाली. अनेक वर्षांपूर्वी असाच मॅच फिक्सिंगचा राक्षस अवतरला होता आणि ज्यात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबरच भारतीय खेळाडूही गिळंकृत झाले होते. मोहंम्मद अझरुद्दिन, नयन मोंगिया, अजय जाडेजा यासारखे त्यावेळेचे भारताचे आघाडीचे खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्याचं उघड झालं आणि भारतीय क्रिडा रसिकांना धक्का बसला. आपण पाहत असलेल्या प्रत्येक मॅचचा निकाल आधीच ठरलेला आहे आणि खेळाडू हे फक्त कळसुत्री बाहुल्यांसारखे मैदानात वावरत आहेत याची जाणीव जगाला झाली. आपण ज्या खेळावर जीवापाड प्रेम करतो, खेळातली उत्सुकता आपल्या अंगावर रोमांच उभे करते आणि जो खेळ हा आपला जणू धर्म झालेला आहे अश्या हृदयाशी अत्यंत जवळ असलेल्या गोष्टीशी प्रतारणा होणे म्हणजे काय हे भारतीयांना कळले. भारतीय रसिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि खेळाडूंच्या घरावर हल्ले झाले, मोर्चे निघाले, पुतळे जाळले गेले. काही दिवस गदारोळ माजून नंतर पुन्हा सगळं शांत झालं.
    पण नीट विचार केला तर फिक्सिंग म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीच्या निकालाची आधीच खात्री करुन घेणे, निकाल ठरवून टाकणे आणि तो ठरावा यासाठी आवश्यक ते बदल करणे किंवा करवून घेणे…. माणसाला उत्सुकता ताणली जायला निश्चितच आवडते, पण त्याच बरोबर प्रत्येक गोष्टीत यशाची शाश्वती त्याला गरजेची वाटते. म्हणूनच तर भविष्याचा वेध घेऊन आपण भावी काळात आपल्यापुढे काय मांडून ठेवले आहे याचा अंदाज घेतो. समजा त्याच वेळी आपल्याला आपलं भविष्य बदलता आलं तर? क्रिकेट मॅच च भविष्य ठरवणं हा क्रिकेट फिक्सिंगचा खरा अर्थ झाला. या फिक्सिंग इंडस्ट्रीचा करोडो डॉलर्सचा व्यवहार चालतो. मॅचेसवर बेटींग करणा-या लोकांनी जिंकण्यासाठी घेतलेलं ह एक पाऊल असतं. यात बुकी, बेटींग करणारे धनदांडगे, माफिया आणि खेळाडू सगळेच गुंतलेले असतात. आपल्या नैसर्गिक खेळाचं प्रदर्शन न करता कुवतीपेक्षा कमी performance देणं आणि मॅच हरणं हे फिक्सिंग मधे हातोहात घडतं. त्या बदल्यात खेळाडूंना प्रचंड पैसे मिळतात. अति पैश्याच्या हव्यासातूनच खेळाडू असल्या मार्गाने जातात.
   मला प्रश्न असा पडतो कि क्रिकेट किंवा फुटबॉल सारख्या खेळात आत्ताच्या काळात, पैसा आणि प्रसिद्धी आधीच खुप असताना खरच या घाणेरड्या पैश्यांची गरज असते का? केवळ अति पैश्याच्या हव्यासापोटी ज्या रसिकांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना फसवायला या हावरटांचं मन धजावतच कसं? बरं फिक्सिंग हा प्रकार फक्त क्रिकेट मधेच होतो असं नाही, तर रियॅलिटी शोज, अवॉर्ड फंक्शन्स, सरकारी मानाचे पुरस्कार, इतकच कशाला परिक्षेतही होतच की. आपण देवालाही नवस बोलून, नैवेद्य आणि इतर प्रलोभनांचं अमिष दाखवून सेट करायला बघतो. त्यामुळे इतर कुणाला दोष देण्यापेक्षा आपण फिक्सिंग प्रकरणात दोष आपल्याच मानसिकतेला द्यायला हवा. आपल्याच भ्रष्टाचारी विचारांमुळे आज हे फिक्सिंग प्रकरण वाढलं आहे. आपणच जर भविष्यातल्या अनोळखी चढ उतारांकडे उतुस्कतेने पाहिलं आणि येणा-या वळणांना आनंदाने सामोरे जाऊ लागलो तर कुठलिही गोष्ट फिक्स करायची आपल्याला गरजच पडणार नाही. ख-या अर्थाने निर्भेळ आयुष्य आपण जगू शकू. आणि कुणाच्याही तालावर न नाचता स्वतःच्या नैसर्गिक कुवतीवर जग चालेल. फिक्सिंग मैदानावर होत नसतं, आपल्या मनात, आपल्या डोक्यात होत असतं त्याला आळा आपणच घालू शकतो.

2 comments: