Friday, January 28, 2011

दरवाजे...


दरवाजे….. 
मोठी अतरंग गोष्ट असते हि…. 
खरच…. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी….

काही दरवाजे…. राकट, कठोर, आक्रस्ताळे…
काही दरवाजे…. फिकट, माफक, मोडकळीला आलेले…
काही दरवाजे…. जुनाट, कळकट्ट, करकरणारे….
काही दरवाजे…. झक्कास, शिसवी लाकडला, पालिश फासलेले…
काही दरवाजे…. भव्य, बलाढ्य, अणकूचीदार खिळ्यांनी मढवलेले….
काही दरवाजे… चोर, छोटूसे, पळवाटांना बिलगणारे….

काही दरवाज्यांना कडी कुलपाने जखडलेलं….
काही दरवाज्यांना कोळीष्ट्कांनी झाकलेलं….
काही दरवाज्यांवर मंगलमूर्ती…..
काही दरवाज्यांवर क्रॉस, टि….
काहीं दरवाज्यांवर लांबच लांब पाट्या….
काही दरवाज्यांवर कायमच आठ्या….

काही दरवाजे… सताड उघडे….
काही दरवाजे…. किलकिले थोडॆ….
काही दरवाजे मात्र… अवघडलेले….

प्रत्येक दरवाज्यामागे दडलेली असते एक गोष्ट….
निट कान लावून बसलात तर ऐकू येईल स्पष्ट….

दरवाजे….
आतल्यांना आत आणि बाहेरच्यांना बाहेर रोखणारे….
भावनांना बांध घालणारे….
या कानाची गोष्ट त्या कानाला कळू न देणारे….
प्रायव्हसी जपणारे….
लाज राखणारे…..
दरवाजे….

- सुबोध,

२९ जानेवारी २०११

Thursday, January 13, 2011

थोडं हातचं राखून ठेवावं….


नेहमीच जरा सांभाळावं, थोडं हातचं राखून ठेवावं…
प्रत्येक ठिकाणी धसमुसळेपणा नको,
भावनांची गर्दी नको…
स्पष्टवक्तेपणा नको,
गुंतत जाणं तर नकोच नको….
तेवढ्यापुरतच वागावं,
मनाला आपल्या समजवावं…. थोडं हातचं राखून ठेवावं….

जेवणात मिठ जास्तं झालं तर बिघडते ना चव?
बाजारात माल जास्त आला तर उतरतो ना भाव?
मग emotions चं पण तसच तर असतं,
मनापासून काही सांगाल तर आगाऊ वाटाल,

खुप प्रेम दाखवाल तर over possessive दिसाल….
त्यापेक्षा गप्प बसावं, मनाला आपल्या समजवावं….
थोडं हातचं राखून ठेवावं….

तुमच्या आनंदाने दुस-याला खरच आनंद होतो का?
तुमच्या दुःखात खरच समोरचा रडतो का?
मग तुमच्या भावना कश्या पोहोचतील समोरच्यापर्यंत?
आणि त्या पोहोचाव्या हा अट्टाहास तरी का करावा?
माणसाने emotional च नसावं, एकदम रुक्ष, स्थितप्रज्ञ दिसावं,
भावनांच्या बाबतीत, थोडं हातच राखूनच ठेवावं….

हो… हातचं राखूनच ठेवावं….
नाहितर मग लोक दुखावतात…
चटकन रागावतात…..
समोरासमोर भेटणं टाळतात….
दूरूनच पाहून रस्ता बदलतात…..
अगदी “जवळचे” वाटणारेही कायमचे दुरावतात….
क्षणार्धात आपल्याला SHIFT + DELETE करुन टाकतात….

माणूस हा कळपाने राहणारा प्राणी ना? मग तो एकटा पडला तर काय होईल?
छे…. असा धोका का पत्करायचा? भावूकपणा का जपायचा?
भावनांना या जगात काडीचीही किम्मत नाही…..
Emotions ना इथे कुत्रं सुद्धा भिक घालत नाही…..

म्हणून विनवतोय, मनापसून, अगदी आतून….
पुन्हा भावूक होऊन गाढवपणा करतोय….
एवढं मोठं लेक्चर देऊन स्वतः मात्र वाहतोय…..
पण, नेहमीच जरा सांभाळावं,
थोडं हातचं राखून ठेवावं…
मनातलं मनातच खोल कुठेतरी दडवावं….
मधाळ बोलावं आणि खोटं हास्य मिरवावं…..
ह्या जगात थोडं हातचं राखूनच ठेवावं…. या जगात थोडं हातचं राखूनच ठेवावं…..
- सुबोध,
१३ जानेवारी, २०११

Monday, January 10, 2011

ये फिक्सिंग है बॉस!!!


  “ये सेट हे बॉस… ऑलरेडी फिक्स आहेत गोष्टी…. सेटींग करुन ठेव ना…. जॅक लागलाय ना नीट? एक्का चिकटवला? ऑल डन?” विचीत्र वाटताएत ना हि वाक्य? अचानक हे काय सुरु झालय असं वाटतय ना? बरोब्बर! असच वाटलं सगळ्यांना जेंव्हा काही दिवसांपूर्वी अचानाक क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या हिमनगाचं टोक पुन्हा दिसू लागलं. या वेळेस पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंना मॅच फिक्सिंग प्रकरणात रंगेहाथ पकडण्यात आलं. पेपरात आणि टिव्ही न्यूज चॅनल्सवर सनसनीखेज बातम्या चालवल्या गेल्या, पाकिस्तानी खेळाडूंना दूषणं दिली गेली. लागोलाग खेळाडूंवर कारवाईही झाली आणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी फिक्सिंग या विषयावर चर्चा सुरु झाली. अनेक वर्षांपूर्वी असाच मॅच फिक्सिंगचा राक्षस अवतरला होता आणि ज्यात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबरच भारतीय खेळाडूही गिळंकृत झाले होते. मोहंम्मद अझरुद्दिन, नयन मोंगिया, अजय जाडेजा यासारखे त्यावेळेचे भारताचे आघाडीचे खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्याचं उघड झालं आणि भारतीय क्रिडा रसिकांना धक्का बसला. आपण पाहत असलेल्या प्रत्येक मॅचचा निकाल आधीच ठरलेला आहे आणि खेळाडू हे फक्त कळसुत्री बाहुल्यांसारखे मैदानात वावरत आहेत याची जाणीव जगाला झाली. आपण ज्या खेळावर जीवापाड प्रेम करतो, खेळातली उत्सुकता आपल्या अंगावर रोमांच उभे करते आणि जो खेळ हा आपला जणू धर्म झालेला आहे अश्या हृदयाशी अत्यंत जवळ असलेल्या गोष्टीशी प्रतारणा होणे म्हणजे काय हे भारतीयांना कळले. भारतीय रसिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि खेळाडूंच्या घरावर हल्ले झाले, मोर्चे निघाले, पुतळे जाळले गेले. काही दिवस गदारोळ माजून नंतर पुन्हा सगळं शांत झालं.
    पण नीट विचार केला तर फिक्सिंग म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीच्या निकालाची आधीच खात्री करुन घेणे, निकाल ठरवून टाकणे आणि तो ठरावा यासाठी आवश्यक ते बदल करणे किंवा करवून घेणे…. माणसाला उत्सुकता ताणली जायला निश्चितच आवडते, पण त्याच बरोबर प्रत्येक गोष्टीत यशाची शाश्वती त्याला गरजेची वाटते. म्हणूनच तर भविष्याचा वेध घेऊन आपण भावी काळात आपल्यापुढे काय मांडून ठेवले आहे याचा अंदाज घेतो. समजा त्याच वेळी आपल्याला आपलं भविष्य बदलता आलं तर? क्रिकेट मॅच च भविष्य ठरवणं हा क्रिकेट फिक्सिंगचा खरा अर्थ झाला. या फिक्सिंग इंडस्ट्रीचा करोडो डॉलर्सचा व्यवहार चालतो. मॅचेसवर बेटींग करणा-या लोकांनी जिंकण्यासाठी घेतलेलं ह एक पाऊल असतं. यात बुकी, बेटींग करणारे धनदांडगे, माफिया आणि खेळाडू सगळेच गुंतलेले असतात. आपल्या नैसर्गिक खेळाचं प्रदर्शन न करता कुवतीपेक्षा कमी performance देणं आणि मॅच हरणं हे फिक्सिंग मधे हातोहात घडतं. त्या बदल्यात खेळाडूंना प्रचंड पैसे मिळतात. अति पैश्याच्या हव्यासातूनच खेळाडू असल्या मार्गाने जातात.
   मला प्रश्न असा पडतो कि क्रिकेट किंवा फुटबॉल सारख्या खेळात आत्ताच्या काळात, पैसा आणि प्रसिद्धी आधीच खुप असताना खरच या घाणेरड्या पैश्यांची गरज असते का? केवळ अति पैश्याच्या हव्यासापोटी ज्या रसिकांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना फसवायला या हावरटांचं मन धजावतच कसं? बरं फिक्सिंग हा प्रकार फक्त क्रिकेट मधेच होतो असं नाही, तर रियॅलिटी शोज, अवॉर्ड फंक्शन्स, सरकारी मानाचे पुरस्कार, इतकच कशाला परिक्षेतही होतच की. आपण देवालाही नवस बोलून, नैवेद्य आणि इतर प्रलोभनांचं अमिष दाखवून सेट करायला बघतो. त्यामुळे इतर कुणाला दोष देण्यापेक्षा आपण फिक्सिंग प्रकरणात दोष आपल्याच मानसिकतेला द्यायला हवा. आपल्याच भ्रष्टाचारी विचारांमुळे आज हे फिक्सिंग प्रकरण वाढलं आहे. आपणच जर भविष्यातल्या अनोळखी चढ उतारांकडे उतुस्कतेने पाहिलं आणि येणा-या वळणांना आनंदाने सामोरे जाऊ लागलो तर कुठलिही गोष्ट फिक्स करायची आपल्याला गरजच पडणार नाही. ख-या अर्थाने निर्भेळ आयुष्य आपण जगू शकू. आणि कुणाच्याही तालावर न नाचता स्वतःच्या नैसर्गिक कुवतीवर जग चालेल. फिक्सिंग मैदानावर होत नसतं, आपल्या मनात, आपल्या डोक्यात होत असतं त्याला आळा आपणच घालू शकतो.

Tuesday, January 4, 2011

जित्याची खोड....

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात..... 
अगदी करेक्ट आहे ते.... काही काही सवयी आपल्या आयुष्याचा इतका भाग बनून गेलेल्या असतात कि, कितीही टाळू म्हटलं, अमुक एक करायचं नाही म्हटलं तरी होऊन जातं.... खोड म्हणतात ती हिच.... होतेच ती हातून... किंवा मनाकडून?

फार वर्षांच्या सवयी असतात त्या... तुटता तुटत नाहित.... नकळत माती खाऊन जातोच आपण... 

कितीही मोठे झालो तरी, ताई आणि मी घराचे जिने चढताना रेस लावतोच, अजूनही.... आणि दाराजवळ आल्या आल्या मोठ्याने आईला हाक मारणंही तसच.... शाळेत असताना असायचं तसं....
मी लहान असताना दर दोन मिनीटांनी स्वतःच्या गालावर बोट नाचवत बसायचो, खुप ओरडा, बोलणी खाल्लीत त्यावरुन... पण ती सवय सुटेचना....  मोठा होता होता ती सवय विरळ होत गेली... पण आजही कधीतरी अचानक मला लक्षात येतं कि " अरे, मी तर माझ्या गालावर बोटं नाचवतोय, आत्ता, या क्षणी..."
कुठल्याही वस्तूला पाय लागताच नमस्कार करण्याची सवयही तशीच.... मॅनर्स म्हणून चांगली वाटते, पण इतकी सवय झालेली असते कधी कधी, कि दिवसातून १०० वेळा नुसतं, निरर्थक पाया पडणं होतं... 
वर्षानुवर्ष बाईकला किक मारण्याची सवयही, तशीच... आणि मग बटण स्टार्ट सुरु असलं तरी उगाच बाईकला लाथा मारत बसणं.... मग रियलाईझ झाल्यावर जीभ चावणं....
बाईक चालवताना तर कित्येकदा मन भरकटलेलं असतं कुठे तरी.... हात आणि पाय, शरीर सांभाळत बाईक चालवत असतात, पण ठराविक टर्न जवळ आल्यावर आपोआप लेफ्टचा सिग्नल दिला जातो... सवयीने....
वरळी नाक्यावरच्या अनोळखी "चेतन" ला मारलेली ओळखीची हाकही तशीच, सवयीची....
आणि ठेच लागल्यावर किंवा मित्र, (किंवा सॉल्लीड मुलगीही) दिसल्यावर तोंडातून येणारी शिवीही, तशीच सवयीची.....
आपल्या प्रत्येक श्वासात एक सवय लागलेली असते आपल्याला, अमुक पद्धतीने बोलायची, अमुक पद्धतीने हसायची, रिएक्ट व्हायची, चालायची.... अगदी श्वास घ्यायची सुद्ध.....

पण हे टाळायला हवं.... सवय लागणं टाळायला हवं.... सवयची मग खोड होते... आणि ती सुटता सुटत नाही.... आयुष्याचा भाग बनून जाते.... असा भाग, जो नकोसा वाटत असतो, पण टाळताच येत नाही....
आणि माणसांची सवय लागणं तर सगळ्यात भयानक....  प्रचंड वेदना देणारी....  इतर सवयी शिक्षा करुन, हातावर फटके मारुन, ओरडून, चटके देऊन, सोडवता येतात.....
पण..... माणसाची सवय कशी सुटणार????कितीही कोणी जबरदस्ती केली तरी?????
ती लागतानाच अशी घट्ट बिलगते कि सुटता सुटत नाही.... कितीही चटके बसले तरी.....
टाळायला हवी.... हि सवय.... टाळायला हवी....

- सुबोध
४ जानेवारी २०११

Friday, December 31, 2010

2000 to 2010 माझं दशक.....

या दशकाचे शेवटचे काही तास....
काही तासातच २०१० संपेल आणि नवीन दशक सुरु होईल.... २०११ च्या स्वरुपात....
माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं दशक म्हणावं लागेल हे....
  A journey from CHILDHOOD to YOUTH.....  २००० साली मी शाळा संपवून कॉलेज लाईफ मधे एन्टर झालो... आपण आपल्या आयुष्यात नक्की काय करणार याचा निर्णय बहुदा आपल्या कॉलेजलाईफ मधेच होतो.... आपली वैचारिक आणि मानसिक जडण घडण याच काळात होत असते... नवनवे लोक भेटत असतात.... नवनवीन विचार कळत असतात.... अनुभव येत असतात... शाळेत असताना आपण खुप secured असतो.... घरात आई-बाबा आणि शाळेत शिक्षक आपल्याला सांभाळून घेत असतात.... पण कॉलेज लाईफ मधे ख-या अर्थाने आपण मोकळे असतो... समोर अपरिचीत विश्व असतं आणि डोळ्यात ते जाणून घ्यायची चमक....
कॉलेजलाईफ मधून मी काय मिळवलं? काय शिकलो? अभ्यास? (GRADUATE झालोच) पण महत्वाची गोष्ट मिळवली, ती म्हणजे.... नाटक!!! नाटकाबद्दल, Entertainment field बद्दल passion मिळालं ते इथेच....  याच क्षेत्राशी निगडीत काहितरी करायचं हि उर्मी मिळाली ती कॉलेजमधेच..... TEAM SPIRIT, HARD WORK, SUPPORT, FOCUS.... य़ाचं महत्व कळलं याच कॉलेज लाईफमधे.....

आणि कॉलेज संपल्यानंतरचा दुसरा महत्वाचा टप्पाही याच दशकात आला....
Post college phase.... कॉलेजमधे आपण रमू लागलेलो असतानाच, comfortable वाटत असतानाच ते संपतं... आणि तिथेच राहण्याचा मोह टाळून बाहेरच्या जगात जाण्याची वेळ येते.... आपण कॉलेजलाईफ मधे काय मिळवलं, काय शिकलो हे practically पडताळून पाहण्याची वेळ येते.... prove करण्याची वेळ येते....
डोळ्यात प्रचंड आशा आणि समोर अथांग पसरलेला समुद्र.....

स्ट्रगलचे दिवस सुरु झाले.... आपण एवढ्या मोठ्या महानगरात किती शुल्लक आहोत हे कळण्याचे दिवस.... धडपडीचे दिवस.... रोज नवीन सुरुवात करण्याचे दिवस.... प्रयत्नांचे दिवस.... कधी आशा, तर कधी निराशा.... स्वतःवरचा विश्वास तपासून बघण्याचे दिवस.... काही आनंदाचे तर काही दुःखाचे दिवस.....अभिनय करता करता अचानक लेखक म्हणून करियर करण्याची सुरुवात याच काळातली.... पालखी, स्ट्रगलर्स, हापूस, शुभंकरोति सारखी productions याच काळातली....
(२०१० मधेच खरतर हापूस रिलिज झाला, आणि शुभं करोति सारखी आयुष्यभर लक्षात राहिल अशी मालिका करायला मिळाली)
दरवर्षी आपण आहोत त्याच्यापेक्षा किमान एक पाऊल पुढे जावं.... हा प्रयत्न असतो माझा.... काहितरी नवीन करण्याचा, पुढे जाण्याचा हट्ट असतो....

उद्यापासून २०११ सुरु... नवीन दशक सुरु....
हे येणारं दशक मागल्या दशकाहून जास्त महत्वाचं आणि deciding असणार आहे.... मिळालेली दिशा योग्य आहे कि नाही हे ठरवणारं.... prove करायला लावणारं..... आपण आहोत त्याच मार्गावर चालू शकतोय कि नाही हे पाहणारं.... रोज नवीन twist and turns असणारं....
बघुया.... काय स्क्रिनप्ले आहे पुढच्या दशकाचा......


- सुबोध
  ३१ डिसेंबर, २०१०

Thursday, December 23, 2010


इर्षा… स्वतःला सिद्ध करण्याची…

इर्षा… यशस्वी होण्याची…

इच्छा… जग जिंकायची…

इच्छा… मनं जिंकायची…

गती… वा-याएवढी…

गती… वाढत जाणारी…

ताकद… आस्मानाएवढी…

ताकद… क्षणार्धात झुकायला लावणारी…

हिम्मत… घोंघावणारी…

हिम्मत… मन कठोर करणारी…

बुद्धी… बरं वाईट ओळखणारी…

बुद्धी… विनम्र जगायला बजावणारी….

प्रेम… हृदयात दाटलेलं…

प्रेम… ब्रम्हांड व्यापणारं….

दुःख… जागं ठेवणारं…

दुःख…. भानावर आणणारं…

यश… सार्थकी लावणारं…

यश… दृष्टीकोन बदलणारं…

मी… एकटाच….

मी…. स्वतःचाच शोध घेणारा…

Wednesday, December 22, 2010

उद्रेक

एका इंग्रजी सिनेमातला भव्य प्रसंग, हजारो-लाखो गाड्या रस्त्यावर स्तब्ध उभ्या, रस्ता कोंडून टाकलेला. नजर पोहोचेपर्यंत गाड्याच गाड्यांचं साम्राज्य आणि त्यांच्या ब्रेक्सच्या लाल दिव्यांची लुकलुक. याच्या सोबतीला तुफान पाऊस आणि वादळ. लाखो लोकांचे होणारे हाल आणि जनता बेहाल. शहरावर आलेलं एक भयाण संकट.

ओळखीचा वाटला ना प्रसंग? बरोब्बर, २६ जुलै या ऐतिहासिक तारखेशी जोडलं गेलेलंच वर्णन आहे हे. मुंबईकरांनी त्यांच्या उभ्या हयातीत पहिल्यांदा अनुभव घेतला होता अश्या भिषण नैसर्गिक आपत्तीचा. अनेक जण मृत्यूमुखी पडले, अनेकांची घरंदारं वाहून गेली. अनेक जणं बेघर झाले. मुंबईचं सगळं infrastructure च कोलमडून गेलं. त्यानंतर या आपत्तीमागच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला, रिपोर्ट्स बनवले गेले, चर्चासत्र झडली, निसर्गाच्या कोपावर ठपका ठेवण्यात आला आणि सोबतीला मिठी नदीला दावणीला बांधण्यात आलं. पण खरं पाहता निसर्गाने आपल्याला दिलेला तो सावधानतेचा इशारा होता असच वाटतं. मुंबई हि सात बेटांची मिळून बनलेली नगरी. सात बेटं जोडून त्यात देशभरातून आलेले लोक राहू लागले. इथे एक नवी संस्कृती उदयाला आली आणि या मनोहारी, अद्भूत आणि सा-यांना हेवा, आकर्षण वाटेल अश्या शहराचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात लाखो लोकांना आपल्यात सामावून घेणा-या या नगरीचा आकार हळू हळू मोठा होत गेला. आधी माहिम, वांद्रे पर्यंतच असलेलं हे शहर पुढे गोरेगाव, बोरीवली करत आता थेट दहिसर पुढे जाऊन पोहोचलय (जिल्हा वेगळा, पण अगदी विरार पर्यंतचा भाग हा आता मुंबईतच गणला जातो) गायीचा आकार घेण्याच्या नादात फुग फुग फुगणा-या बेडकी सारखी आता तिची अवस्था झालेली आहे, त्याच गोष्टीप्रमाणे एक दिवस मात्र हे शहर फुटेल कि काय अशी भिती मनात आल्याशिवाय राहत नाही. पायाभूत सोयी सुविधांवर तर इतका ताण पडतो आहे. ब्रिटीश काळात बांधलेली हॉस्पीटल्स, रस्ते, रेल्वे स्टेशन्स यांचं आपण आजही कौतुक करतो ते त्याच्या भव्यतेमुळे. त्या काळातही भविष्याचा विचार करुन, वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन मजबूत पायाभूत सोयी सुविधा ब्रिटीशांनी तयार केल्या आणि त्यामुळेच आजही त्या वास्तूंचा आपल्याला वापर करता येतो. पण मुंबईत वाढत जाणारी माणसांची गर्दी, त्यांच्या दैनंदिन गरजा, आणि त्याचा infrastructure वर पडणारा ताण पाहता, मुबई अजून किती वर्ष हे सगळं सहन करु शकेल हा प्रश्नच पडतो.

टंचाई हा शब्द तर मुंबईकरांच्या अंगवळणीच पडलेला आहे. पाण्याची टंचाई, जीवनावश्यक पदार्थांची टंचाई, दूधाची टंचाई, वीजेची टंचाई, जागेची टंचाई…. किती नावं घ्यायची? बरं या सगळ्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला गेल्यास सरळ सरकारवर खापर फोडून आपण मोकळे. सरकारने टंचाईवर उपाय करायला हवेत. “पाणी टंचाई जाणवतेय ना? मग नवीन तलाव बांधा ना, नवीन पाईपलाईन टाका, झोपा कसल्या काढताय?” इति, सामान्य नागरिक. पण आपल्याला महानगरपालिका इतकं स्वच्छ पाणी घरापर्यंत आणून देते, तेही दरोरोज, त्याचा आपल्याला आदर आहे का? किंमत आहे का? गावात मैलोंनमैल डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणावं लागतं, त्यातूनही ते पाणी निर्मळ असेल याची शाश्वती नाही. त्या मानाने मुंबईकरांना फारच जास्त सुख मिळते आहे. आणि आपण त्याचा गैरवापर करतो. पाण्याची आप्ण फारच उधळपट्टी करतो. दरोरोज आपल्याला माणशी साठ ते ऐशी लिटर पाणी दैनंदिन गरजेला लागतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या कित्येक पट अधिक पाणी आपण रोज उपसतो. रोज बादल्यांमधे पाणी भरुन ठेवतो आणि दुस-या दिवशी तेच पाणी जुनं झालं म्हणून, शिळं झालं म्हणून ओतून टाकतो. एखादा नळ गळत असला तर तो ताबडतोब दुरुस्त करुन घेण्यात आपण दिरंगाई करतो आणि याच नळातून वर्षाकाठी पंधरा हजार लिटर पाणी थेंबांच्या स्वरुपात वाहून जातय याकडे दुर्लक्ष करतो. मुंबईला पावसाच्म इतकं पाणी मिळतं, पण आपण रेन वॉटर हार्वेस्टींगचा पर्याय अजूनही आचरणात आणलेला दिसत नाही. एवढ्या विशाल वाढलेल्या शहराला प्रशासनाने पाणी पुरवठा करणं गरजेचच आहे, पण आपण स्वतःही आपल्या गरजा आटोक्यात ठेवणं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सहाय्याने Water independent society ची निर्मिती करणं आवश्यक आहे.

जो प्रश्न पाण्याचा तोच वीजेचा, वीजेचा वापरही अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त करतो. गरज नसताना दिवे बंद करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे यासारख्या साध्या सुचनांवर अमल करत नाही. याबाबतीत तरुण पिढीची मतही भिन्न आहेत, काहिंच्या मते वीजेचा वापर हा काटेकोरपणेच व्हायला हवा, त्यासाठी अश्या उपकरणांचा शोध लागायला हवा ज्यात वीजबचत जास्त होईल आणि कामही वेगात पूर्ण होईल. तर याच्या अगदी विरिद्ध मत असलेलेही आहेतच कि, त्यांच्या मते, वीजेची निर्मीती हा एक उद्योग आहे. त्यासाठी मोठमोठाले प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सामान्य माणसाला वीज वापरल्यानंतर त्याचं शुल्क आकारण्यात येतं. वीजबील आम्ही नियमीत भरतो. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण विकत घेतो, त्याच प्रामाणे आपण वीज विकत घेतो. मग त्याचा वापर आम्ही काटेकोरपणे का करावा? मागणी तसा पुरवठा करणं हि वीजनिर्मीती करणा-या कंपनीचं काम आहे. ते त्यानी करावं. एकूणातच पायाभूत सोयी सुविधा वाढवणं हि जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी ती उचलावी. त्यासाठी जनतेला वेठीस धरु नये.

जशी माणसं अनेक तश्या त्यांच्या प्रतिक्रिया, विचारही भिन्न, पण एक गोष्ट मात्र नक्की कि आपण आपल्याला मिळत असलेल्या सोयीसुविधांचा नीट, काटेकोरपणे वापर करावा, नासाडी करु नये। लोकसंख्या वाढ किंवा मुंबईत येणारे लोंढे आटोक्यात आणण्यात यश आले तर फारच मोठा ताण कमी होईल हे नक्की, परंतु आपण जर पायाभूत सोयी सुविधांना पर्याय शोधून आणि सार्वजनिक सोयीसुविधांचा योग्य वापर करण्याची सवय आपल्या घरापासूनच लावली, तर भविष्यात टंचाई ची भिती आपल्याला उरणार नाही. आणि भविष्यात होणा-या मोठ्या उद्रेकापासून आपण वाचू शकू. अन्यथा Infrastructure कोलमडून मुंबई नगरीवर संकटं येणं निश्चित आहे.

- सुबोध