Friday, December 31, 2010

2000 to 2010 माझं दशक.....

या दशकाचे शेवटचे काही तास....
काही तासातच २०१० संपेल आणि नवीन दशक सुरु होईल.... २०११ च्या स्वरुपात....
माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं दशक म्हणावं लागेल हे....
  A journey from CHILDHOOD to YOUTH.....  २००० साली मी शाळा संपवून कॉलेज लाईफ मधे एन्टर झालो... आपण आपल्या आयुष्यात नक्की काय करणार याचा निर्णय बहुदा आपल्या कॉलेजलाईफ मधेच होतो.... आपली वैचारिक आणि मानसिक जडण घडण याच काळात होत असते... नवनवे लोक भेटत असतात.... नवनवीन विचार कळत असतात.... अनुभव येत असतात... शाळेत असताना आपण खुप secured असतो.... घरात आई-बाबा आणि शाळेत शिक्षक आपल्याला सांभाळून घेत असतात.... पण कॉलेज लाईफ मधे ख-या अर्थाने आपण मोकळे असतो... समोर अपरिचीत विश्व असतं आणि डोळ्यात ते जाणून घ्यायची चमक....
कॉलेजलाईफ मधून मी काय मिळवलं? काय शिकलो? अभ्यास? (GRADUATE झालोच) पण महत्वाची गोष्ट मिळवली, ती म्हणजे.... नाटक!!! नाटकाबद्दल, Entertainment field बद्दल passion मिळालं ते इथेच....  याच क्षेत्राशी निगडीत काहितरी करायचं हि उर्मी मिळाली ती कॉलेजमधेच..... TEAM SPIRIT, HARD WORK, SUPPORT, FOCUS.... य़ाचं महत्व कळलं याच कॉलेज लाईफमधे.....

आणि कॉलेज संपल्यानंतरचा दुसरा महत्वाचा टप्पाही याच दशकात आला....
Post college phase.... कॉलेजमधे आपण रमू लागलेलो असतानाच, comfortable वाटत असतानाच ते संपतं... आणि तिथेच राहण्याचा मोह टाळून बाहेरच्या जगात जाण्याची वेळ येते.... आपण कॉलेजलाईफ मधे काय मिळवलं, काय शिकलो हे practically पडताळून पाहण्याची वेळ येते.... prove करण्याची वेळ येते....
डोळ्यात प्रचंड आशा आणि समोर अथांग पसरलेला समुद्र.....

स्ट्रगलचे दिवस सुरु झाले.... आपण एवढ्या मोठ्या महानगरात किती शुल्लक आहोत हे कळण्याचे दिवस.... धडपडीचे दिवस.... रोज नवीन सुरुवात करण्याचे दिवस.... प्रयत्नांचे दिवस.... कधी आशा, तर कधी निराशा.... स्वतःवरचा विश्वास तपासून बघण्याचे दिवस.... काही आनंदाचे तर काही दुःखाचे दिवस.....अभिनय करता करता अचानक लेखक म्हणून करियर करण्याची सुरुवात याच काळातली.... पालखी, स्ट्रगलर्स, हापूस, शुभंकरोति सारखी productions याच काळातली....
(२०१० मधेच खरतर हापूस रिलिज झाला, आणि शुभं करोति सारखी आयुष्यभर लक्षात राहिल अशी मालिका करायला मिळाली)
दरवर्षी आपण आहोत त्याच्यापेक्षा किमान एक पाऊल पुढे जावं.... हा प्रयत्न असतो माझा.... काहितरी नवीन करण्याचा, पुढे जाण्याचा हट्ट असतो....

उद्यापासून २०११ सुरु... नवीन दशक सुरु....
हे येणारं दशक मागल्या दशकाहून जास्त महत्वाचं आणि deciding असणार आहे.... मिळालेली दिशा योग्य आहे कि नाही हे ठरवणारं.... prove करायला लावणारं..... आपण आहोत त्याच मार्गावर चालू शकतोय कि नाही हे पाहणारं.... रोज नवीन twist and turns असणारं....
बघुया.... काय स्क्रिनप्ले आहे पुढच्या दशकाचा......


- सुबोध
  ३१ डिसेंबर, २०१०

Thursday, December 23, 2010


इर्षा… स्वतःला सिद्ध करण्याची…

इर्षा… यशस्वी होण्याची…

इच्छा… जग जिंकायची…

इच्छा… मनं जिंकायची…

गती… वा-याएवढी…

गती… वाढत जाणारी…

ताकद… आस्मानाएवढी…

ताकद… क्षणार्धात झुकायला लावणारी…

हिम्मत… घोंघावणारी…

हिम्मत… मन कठोर करणारी…

बुद्धी… बरं वाईट ओळखणारी…

बुद्धी… विनम्र जगायला बजावणारी….

प्रेम… हृदयात दाटलेलं…

प्रेम… ब्रम्हांड व्यापणारं….

दुःख… जागं ठेवणारं…

दुःख…. भानावर आणणारं…

यश… सार्थकी लावणारं…

यश… दृष्टीकोन बदलणारं…

मी… एकटाच….

मी…. स्वतःचाच शोध घेणारा…

Wednesday, December 22, 2010

उद्रेक

एका इंग्रजी सिनेमातला भव्य प्रसंग, हजारो-लाखो गाड्या रस्त्यावर स्तब्ध उभ्या, रस्ता कोंडून टाकलेला. नजर पोहोचेपर्यंत गाड्याच गाड्यांचं साम्राज्य आणि त्यांच्या ब्रेक्सच्या लाल दिव्यांची लुकलुक. याच्या सोबतीला तुफान पाऊस आणि वादळ. लाखो लोकांचे होणारे हाल आणि जनता बेहाल. शहरावर आलेलं एक भयाण संकट.

ओळखीचा वाटला ना प्रसंग? बरोब्बर, २६ जुलै या ऐतिहासिक तारखेशी जोडलं गेलेलंच वर्णन आहे हे. मुंबईकरांनी त्यांच्या उभ्या हयातीत पहिल्यांदा अनुभव घेतला होता अश्या भिषण नैसर्गिक आपत्तीचा. अनेक जण मृत्यूमुखी पडले, अनेकांची घरंदारं वाहून गेली. अनेक जणं बेघर झाले. मुंबईचं सगळं infrastructure च कोलमडून गेलं. त्यानंतर या आपत्तीमागच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला, रिपोर्ट्स बनवले गेले, चर्चासत्र झडली, निसर्गाच्या कोपावर ठपका ठेवण्यात आला आणि सोबतीला मिठी नदीला दावणीला बांधण्यात आलं. पण खरं पाहता निसर्गाने आपल्याला दिलेला तो सावधानतेचा इशारा होता असच वाटतं. मुंबई हि सात बेटांची मिळून बनलेली नगरी. सात बेटं जोडून त्यात देशभरातून आलेले लोक राहू लागले. इथे एक नवी संस्कृती उदयाला आली आणि या मनोहारी, अद्भूत आणि सा-यांना हेवा, आकर्षण वाटेल अश्या शहराचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात लाखो लोकांना आपल्यात सामावून घेणा-या या नगरीचा आकार हळू हळू मोठा होत गेला. आधी माहिम, वांद्रे पर्यंतच असलेलं हे शहर पुढे गोरेगाव, बोरीवली करत आता थेट दहिसर पुढे जाऊन पोहोचलय (जिल्हा वेगळा, पण अगदी विरार पर्यंतचा भाग हा आता मुंबईतच गणला जातो) गायीचा आकार घेण्याच्या नादात फुग फुग फुगणा-या बेडकी सारखी आता तिची अवस्था झालेली आहे, त्याच गोष्टीप्रमाणे एक दिवस मात्र हे शहर फुटेल कि काय अशी भिती मनात आल्याशिवाय राहत नाही. पायाभूत सोयी सुविधांवर तर इतका ताण पडतो आहे. ब्रिटीश काळात बांधलेली हॉस्पीटल्स, रस्ते, रेल्वे स्टेशन्स यांचं आपण आजही कौतुक करतो ते त्याच्या भव्यतेमुळे. त्या काळातही भविष्याचा विचार करुन, वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन मजबूत पायाभूत सोयी सुविधा ब्रिटीशांनी तयार केल्या आणि त्यामुळेच आजही त्या वास्तूंचा आपल्याला वापर करता येतो. पण मुंबईत वाढत जाणारी माणसांची गर्दी, त्यांच्या दैनंदिन गरजा, आणि त्याचा infrastructure वर पडणारा ताण पाहता, मुबई अजून किती वर्ष हे सगळं सहन करु शकेल हा प्रश्नच पडतो.

टंचाई हा शब्द तर मुंबईकरांच्या अंगवळणीच पडलेला आहे. पाण्याची टंचाई, जीवनावश्यक पदार्थांची टंचाई, दूधाची टंचाई, वीजेची टंचाई, जागेची टंचाई…. किती नावं घ्यायची? बरं या सगळ्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला गेल्यास सरळ सरकारवर खापर फोडून आपण मोकळे. सरकारने टंचाईवर उपाय करायला हवेत. “पाणी टंचाई जाणवतेय ना? मग नवीन तलाव बांधा ना, नवीन पाईपलाईन टाका, झोपा कसल्या काढताय?” इति, सामान्य नागरिक. पण आपल्याला महानगरपालिका इतकं स्वच्छ पाणी घरापर्यंत आणून देते, तेही दरोरोज, त्याचा आपल्याला आदर आहे का? किंमत आहे का? गावात मैलोंनमैल डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणावं लागतं, त्यातूनही ते पाणी निर्मळ असेल याची शाश्वती नाही. त्या मानाने मुंबईकरांना फारच जास्त सुख मिळते आहे. आणि आपण त्याचा गैरवापर करतो. पाण्याची आप्ण फारच उधळपट्टी करतो. दरोरोज आपल्याला माणशी साठ ते ऐशी लिटर पाणी दैनंदिन गरजेला लागतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या कित्येक पट अधिक पाणी आपण रोज उपसतो. रोज बादल्यांमधे पाणी भरुन ठेवतो आणि दुस-या दिवशी तेच पाणी जुनं झालं म्हणून, शिळं झालं म्हणून ओतून टाकतो. एखादा नळ गळत असला तर तो ताबडतोब दुरुस्त करुन घेण्यात आपण दिरंगाई करतो आणि याच नळातून वर्षाकाठी पंधरा हजार लिटर पाणी थेंबांच्या स्वरुपात वाहून जातय याकडे दुर्लक्ष करतो. मुंबईला पावसाच्म इतकं पाणी मिळतं, पण आपण रेन वॉटर हार्वेस्टींगचा पर्याय अजूनही आचरणात आणलेला दिसत नाही. एवढ्या विशाल वाढलेल्या शहराला प्रशासनाने पाणी पुरवठा करणं गरजेचच आहे, पण आपण स्वतःही आपल्या गरजा आटोक्यात ठेवणं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सहाय्याने Water independent society ची निर्मिती करणं आवश्यक आहे.

जो प्रश्न पाण्याचा तोच वीजेचा, वीजेचा वापरही अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त करतो. गरज नसताना दिवे बंद करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे यासारख्या साध्या सुचनांवर अमल करत नाही. याबाबतीत तरुण पिढीची मतही भिन्न आहेत, काहिंच्या मते वीजेचा वापर हा काटेकोरपणेच व्हायला हवा, त्यासाठी अश्या उपकरणांचा शोध लागायला हवा ज्यात वीजबचत जास्त होईल आणि कामही वेगात पूर्ण होईल. तर याच्या अगदी विरिद्ध मत असलेलेही आहेतच कि, त्यांच्या मते, वीजेची निर्मीती हा एक उद्योग आहे. त्यासाठी मोठमोठाले प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सामान्य माणसाला वीज वापरल्यानंतर त्याचं शुल्क आकारण्यात येतं. वीजबील आम्ही नियमीत भरतो. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण विकत घेतो, त्याच प्रामाणे आपण वीज विकत घेतो. मग त्याचा वापर आम्ही काटेकोरपणे का करावा? मागणी तसा पुरवठा करणं हि वीजनिर्मीती करणा-या कंपनीचं काम आहे. ते त्यानी करावं. एकूणातच पायाभूत सोयी सुविधा वाढवणं हि जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी ती उचलावी. त्यासाठी जनतेला वेठीस धरु नये.

जशी माणसं अनेक तश्या त्यांच्या प्रतिक्रिया, विचारही भिन्न, पण एक गोष्ट मात्र नक्की कि आपण आपल्याला मिळत असलेल्या सोयीसुविधांचा नीट, काटेकोरपणे वापर करावा, नासाडी करु नये। लोकसंख्या वाढ किंवा मुंबईत येणारे लोंढे आटोक्यात आणण्यात यश आले तर फारच मोठा ताण कमी होईल हे नक्की, परंतु आपण जर पायाभूत सोयी सुविधांना पर्याय शोधून आणि सार्वजनिक सोयीसुविधांचा योग्य वापर करण्याची सवय आपल्या घरापासूनच लावली, तर भविष्यात टंचाई ची भिती आपल्याला उरणार नाही. आणि भविष्यात होणा-या मोठ्या उद्रेकापासून आपण वाचू शकू. अन्यथा Infrastructure कोलमडून मुंबई नगरीवर संकटं येणं निश्चित आहे.

- सुबोध

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, किती वास्तव?

ये मुंबई नगरिया है देख बबुआ… सोने चांदीकी डगरिया है देख बबुआ…..

मुंबई… स्वप्नांचं शहर…. करोडो माणसांच्या पोटाची खळगी भरणारी जादुई दुनिया... इथे कोणीही यावं… स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटावं आणि या गर्दीने भरलेल्या दुनियेत स्वतःचं स्थान मिळवावं…. हि अशी दुनिया ज्यात कुणीही कधी उपाशी मरत नाही… इच्छा असणा-या प्रत्येकाला इथे त्याचा रस्ता सापडतोच…. म्हणूनच भारतातल्या सगळ्या ठिकाणांहून माणसं या शहराकडे ओढली जातात, आणि हे शहर आपले विशाल बाहू पसरुन सगळ्यांना आपल्यात सामावून घेत मोठं मोठं होत जातं….

महाराष्ट्राची राजधानी असलेलं हे शहर नानाविविध प्रकारच्या, जातीच्या, पंथांच्या आणि विचारशैलींच्या माणसांनी बनलेलं आहे. या शहराला स्वतःचं असं एक अस्तित्व आहे, संस्कृती आहे जी या सगळ्या प्रकारच्या लोकांनी या शहरात एकत्र राहिल्यामुळे विकसित झालेली आहे. पण, १९६० साली १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तयार झालेल्या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची नाळ आता काळाच्या ओघात या मुंबईपासून तुटू लागलेली आहे. दरोरोज आपण मुंबई कुणाची? हा प्रश्न विचारतो आणि त्या नंतर सहज विसरुनही जातो. पण झपाट्याने वाढणारी आणि घड्याळाच्या काट्यावर धावणारी हि मुंबई महाराष्ट्रापासून दुरावत चाललेली आहे हे मात्र त्रिवार सत्य आहे….

मुंबई आणि महाराष्ट्र असा भेदाभेद आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो… अगदी रणजी सामन्यांपासून मोबाईल कंपन्यांच्या रोमिंगसेवे पर्यंत आणि सरकारी योजनांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत…. आणि या सगळ्याला जितके बाहेरुन येणारे लोंढे आणि राजकिय माफिया कारणीभूत आहेत तितकेच आपण मुंबईकरही आहोत. मुळात हा भेदाभेद आपल्या मनात आणि आपल्या डोक्यात इतक्या खोलवर रुतलेला आहे कि तो आपण जाणूनबुजून करतो आहोत असंही म्हणू शकत नाही. मुंबईकर माणूस त्याला मिळत असलेल्या सोयी सुविधांमुळे, ग्लॅमरमुळे, जीवनशैलीमुळे स्वतःला नेहमीच उर्वरीत महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षा श्रेष्ठ समजतो. ग्रामीण भागातल्या प्रश्नांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी सामान्य मुंबईकर अनिभिज्ञ असतो. ग्रामीण भागात काय चाललय हे माहित असणही त्याला महत्वाचं वाटत नाही… स्वतःच्याच विश्वात तो इतका रममाण झालेला आहे कि मुंबई आणि मुंबईप्रेम सोडूनही आपलं, आपल्या हक्काचं जग आहे याकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि हि स्थीती निर्माण व्हायला अनेक कारणं आहेत, .

सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे आत्मकेंद्रीत दृष्टीकोन. मुंबईकर माणसांचा मुळातला दृष्टिकोनच इतका आत्मकेंद्रीत आहे की, आपण, आपलं घर, आपली सोसायटी, आपला परिसर, आपली मुंबई या पलिकडे तो जातच नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नांशी तो कधीच एकरुप होत नाही. साधंचं उदाहरण द्यायचं म्हणजे, मुंबईत एक तास जरी वीज गेली तरी सगळीकडे बोंबाबोंब होते, लगेच न्युज चॅनल्सवर “ब्रेकिंग न्यूज” झळकू लागते, ‘मुंबई मे चली गयी बिजली – करोडो लोग बेहाल’….. पण सारा महाराष्ट्र आज लोडशेडींगचे चटके सहन करतोय याविरोधात मुंबईतले लोक कधी पेटून उठत नाहीत, कारण मुळात ते स्वतःला महाराष्ट्राचा भागच समजत नाहित. विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्येच्या बातम्या दरोरोज मुंबईच्या पेपरात येतात, पण कोप-यात… आणि आपणही तो पेपर वाचून तसाच कुठल्यातरी कोप-यात टाकून देतो…. कारण विदर्भात आत्महत्या केलेला शेतकरी आपला नातलग नसतो…. त्याच्या मृत्यूने आपल्या आयुष्यात फरक पडलेला नसतो…. पण आपण हा विचार करतो का, कि हाच शेतकरी रोज मरमर मरुन… रक्ताचं पाणी करुन जेंव्हा पिक काढतो… तेंव्हाच मुंबईत आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं…. पण तरीही आपल्याला या ग्रामिण महाराष्ट्राची माया वाटत नाही. प्रसारमाध्यमांचं म्हणजेच न्यूज मिडीयाचं शहरीकरण (urbanization) इतकं झालेलं आहे कि ग्रामिण भागातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नाहिये. न्यूज चॅनल्सही हल्ली टि आर पी च्या मागे धावताहेत, त्यामुळे जाहिरातदारांना सुखावण्यासाठी शहरात घडणा-या बातम्या दाखवण्यावर त्यांचा जास्त जोर असतो. मेट्रो मुंबई सारखी विशेष बातमीपत्र या न्यूज चॅनल्सवर दाखवली जातात पण कोकण दर्शन असा वेगळा दरोरोजचा अर्धा तास राखून ठेवला जात नाही. फयानची झळ जितकी कोकणातल्या माणसाला बसली त्याच्या एक शतांश सुद्धा मुंबईच्या माणसाला जाणवली नाही त्याचं कारण हेच आहे.

मुंबईचे प्रश्न आणि महाराष्ट्राचे प्रश्न हे इतके वेगवेगळे होत चालले आहेत कि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात एक भयंकर दरी निर्माण होत आहे आणि त्यातच आपण मुंबईकरांनी ग्रामीण महाराष्ट्राला, तिथल्या लोकांना, त्यांच्या प्रश्नांना क्षूद्र लेखून आपणापासून दूर लोटलेलं आहे. समाजकारणात आपण रसच घेत नाही, मात्र सगळ्या समस्या सहज सोडवल्या जाव्या म्हणून गप्पा मात्र मारतो, इतरांना दोष देतो. मुंबईत महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत जास्त सहज सोयीसुविधा उपलब्ध असल्याने गावाकडे असलेल्या असुविधा आणि समस्या काय आहेत आणि त्याचा ग्रामीण बांधवांना काय त्रास होतो हे आपण जाणूनच घेऊ इच्छित नाही. गावातून शहरात आलेल्या आपल्या ग्रामीण बांधवाच्या पेहरावापासून ते त्याच्या भाषा शैली बद्दल बहुतांश मुंबईकर चेष्ठेच्या मूड मधे दिसतात. गावरान, घाटी, अशुद्ध, मॅनर्सलेस म्हणून आपल्यापासून वेगळा समजतात. पण या महाराष्ट्राच्याच वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांनी दिलेल्या बलिदानानंतर आज मुंबईला तिचे स्वतंत्र अस्तित्व मिळालेले आहे हे आपण विसरतो.

या सा-यातून सांगायचा उद्देश इतकाच, कि मुंबई आणि महाराष्ट्र माणसांच्याच मनात वेगळा झालेला आहे। जोवर आपण स्वतःला मुंबईकर समजून महाराष्ट्रापासून वेगळे करणे थांबवत नाही तो पर्यंत महाराष्ट्र आणि मुंबई एकमेकांच्या जवळ येणार नाही. आणि जर का आपण स्वतःला श्रेष्ठ आणि मुंबईला आर्थिक वसाहत समजत राहिलो तर एक दिवस या मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहित हे खेदाने सांगावेसे वाटते, तेंव्हा उठा आणि या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून तरी आपण मुंबईकर ख-या अर्थाने महाराष्ट्राचा भाग बनूया आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी होण्यापासून वाचवूया.

- सुबोध

लॉग इन

झपाझप काम हातावेगळं केलं जात होतं… फायनल रिपोर्टस तयार केले जात होते…. त्यावरुन पुन्हा एकदा भरभर नजर फिरवताना, मन मात्र घड्याळ्यात किती वाजले आहेत या कडे डोळे लावून होतं… कधी एकदा हि फाईल बंद होतेय आणि इंटरनेट विंडो ओपन करुन आपण लॉग ईन होतोय असं वाटायला लागलं होतं…. शेवटी एकदाचं काम संपलं आणि एका झटक्यात तो लॉगईन झाला… साईन इन करुन त्याने चॅट विंडो उघडली आणि ती ची वाट पाहू लागला… अपेक्षेप्रमाणे ती चं दर्शन मात्र त्याला झालं नाही… हिरव्या किंवा लाल दोन्ही साईन्स तिच्या नावापुढे झळकत नव्हत्या… त्याने बराच वेळ वाट पाहिली… नसत्या क्विज घेत उगाचच टंगळमंगळ केली… खरतर दिवसभर केलेल्या कामामुळे आता त्याचे डोळे पेंगायला लागले होते… डोळ्यातून झोप ओसंडून वाहत होती… पण रोजच्या सारखं तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला झोपायला जायचं नव्हतं… हा त्याचा हट्टच होता म्हणा… शेवटी कंटाळून त्याने तिच्या अकाऊंटवर मेसेज टाकला… गूड नाईट… आय एम लिवींग… टेक केअर… स्वीट ड्रिम्स…. तो हिरमुसला होता… आज दिवसभरात काय काय झालं हे त्याला तिला सांगायचं होतं… पण तिचा आज पत्ताच नव्हता… शेवटी तिला मेसेज टाकल्यावर तो ऑफलाईन जाणार इतक्यात त्याच्या विंडोवर चॅटबॉक्स ओपन झाला आणि तिचा Hiiiiiiii चा मेसेज वाचून त्याला सुखद धक्का बसला…. त्याने पटकन किबोर्डवर हात ठेवला आणि तो टाईप करु लागला… डिअर फ्रेंन्ड…..

नाही, बिलकूल गैरसमज करुन घेऊ नका…. हा कुठल्या फिल्म मधला…. नाटकातला अथवा सगळ्यांच्या प्या-या ईडिअट बॉक्स टिव्ही वरच्या मालिकेतला सिन नाहिये… तर घरा घरात रोज घडणारा प्रसंग आहे… अर्थात ज्यांच्या घरी कॉंप्युटर आणि इंटरनेट आहे अश्या तरुण मुलांनी भरलेल्या घरातला.

This is the virtual world…. हो.. आजकाल तरुणांमधे आणि खरतर सगळ्याच वयोगटातल्या माणसांमधे सॉल्लीड पॉप्युलर असणा-या नेटवर्किंग साईट्स बद्दल बोलतोय मी… फेसबुक, ऑरकुट, हायफाय आणि आता सध्या जोरदार चर्चेत असलेले Twitter, सगळ्याच नेटवर्किंग साईट्स तरुणवर्गात आणि विशेषतः शहरी भागात फारच लोकप्रिय आहेत. आणि या साईट्स वर आपलं अकाऊंन्ट असलचं पाहिजे असा अलिखीत नियमच सध्याची तरुणाई पाळत आहे. आता तुम्ही विचाराल, दिवस दिवस कॉंप्युटर उघडून बसण्यासारखं एवढं असतं तरी काय या साईट्स वर? तर या साईट्स म्हणजे एक parallel world आहे, एक समांतर जग… ज्यात प्रत्येक माणूस स्वतःची एक प्रोफाईल बनवतो… प्रत्येकाचा एक virtual existence, एक आभासी अस्तीत्व… या प्रोफाईलमधे त्या माणसाची सगळी माहिती लिहिलेली असते. अगदी नाव, गाव, जन्मदिनांक, आवडी निवडी, छंद पासून ते काय आवडत नाही, आयडियल मॅच कोण आणि पास्ट रिलेशनशीप कशी होती इथं पर्यंत… त्याचबरोबर त्याचे फोटो अल्बम्स, गेम्स, क्वीज यांचीही रेलचेल या प्रोफाईल पेजेस वर असते. आणि या प्रोफाईल च्या मदतीने तुम्ही जगभरातल्या तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, बिझनेस फ्रेन्डस पर्यंत पोहोचू शकता. खरच… अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या आसपास असतील कि ज्यांचा त्यांच्या बालमित्रांशी संपर्क तुटला होता… आता तो बालमित्र अथवा मैत्रीण कुठे राहते हे सुद्धा माहित नव्हते. पण ऑरकुट आणि फेसबुक सारख्या साईट्स च्या मदतीने अनेक वर्षांनंतर जुने मित्र एकमेकांना भेटले.. पुन्हा जुनी मैत्री जुळून आली. अहो याच नेटवर्किंग साईट्स परदेशात राहणा-या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपल्याशी जोडून ठेवतात. या नेटवर्किंग साईट्स आपल्याला आपल्या मित्रांच्या वाढदिवसाची आठवण करुन देतात. (तशी खास सोय या सा-या नेटवर्किंग साईट्स वर आहे) आपल्या ओळखीच्या माणसाच्या अयुष्यात काय चाललय याची माहिती करुन देतात. एवढच नाही तर चॅटींगच्या रुपात अनेक ओळखी होऊन पुढे चांगली मैत्री, प्रेम आणि लग्नही जुळल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे एक असं विश्व आहे ज्यात प्रत्यक्ष एकमेकांसमोर न येताही लोक एकमेकांच्या इतके जवळ येतात की, घरातल्या माणसांपेक्षाही ते जवळचे वाटू लागतात. अशी अनेक माणसं असतात कि ज्यांच्याशी आपण दरोरोज भेटूनही बोलत नाही, रस्त्याने चालताना समोर आले तर एकमेकांना ओळखही दाखवत नाही, पण या साईट्स वर मात्र तासनतास एकमेकांशी गप्पा मारतो. मला वाटतं, समोरासमोर भेटीत जो एक प्रकारचा बुजरेपणा, awkwardness येऊ शकतो… तो ह्या virtual भेटीत नसल्याने लोक बिनधास्त एकमेकांशी बोलतात.

आता तुम्ही म्हणाल, एकमेकांशी गप्पा मारण्याव्यतिरीक्त आणखी काही होतं की नाही या साईट्सवर… तर हो! होतं… नेटवर्किंग साईट्सच्या वेगवेगळ्या ग्रुप्स मधे विविध विषयांवर पोल्स, डिबेट आणि चर्चा सुरु असतात. एखाद्या विषयावर बिनधास्त आणि मनमोकळी मतं इथे मांडली जातात. यात “ओबामा च्या हातून खरच नोबेल मिळवण्याच्या लाईकीचं काम झालं आहे का?” इथंपासून ते “सचीन ला आज पुन्हा खोटा आऊट दिला” या विषयावर प्रत्येक जण आपापली opinions मांडतात. “कम्युनिटीज”…. या शब्दावरुन लोकांमधे भेद करणारा हा शब्द वाटेल, पण सारख्या आवडी निवडी असलेले, समान विचारांचे जगभरातील लोक या “कम्युनिटीज” द्वारे नेटवर्किंग साईट्स वर एकत्र येतात. मग या कम्युनिटीज कोणत्याही विषयावरच्या असू शकतात, अगदी “I hate to wake up early” पासून ते “everything happens for a reason” पर्यंत आणि “ आमीर खान – फॅन क्लब” पासून ते “कुमार गंधर्व – ग्रेट आर्टिस्ट” पर्यंत…. या विषयांमधली विविधता वाखाणण्याजोगी आहे. जश्या हिरो-हिरोईन्स च्या कम्युनिटीज आहेत, तश्याच सामाजिक प्रश्नांबद्दल जागरुक करणा-याही कम्युनिटीज आहेत. Twitter सारख्या साईट्सवर तर आपल्या मनात आता काय चाललय हे जगाबरोबर शेअर करता येतं… तरूणपिढी आता या साईट्स वर मनातली कोणतीही गोष्ट मनमोकळेपणाने सांगतात. सक्काळी सक्काळी उठल्यावर, “Its wonderful day once again” असं वाचल्यावर आपलाही दिवस आनंदाने सुरु होतो आणि “No Pain No Gain” असं म्हटल्यावर दुस-याला होणा-या त्रासात आपणही त्याला साथ देतो. नेटवर्किंग साईट्स हा असा एक ग्लोबल शेजार आहे, अशी एक लांबलचक चाळ आहे, किंवा अशी एक मोठ्ठी सोसायटी आहे, ज्यात लाख्खो करोडो माणसं गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत राहत आहेत, एकमेकांची सुखदुःख वाटून घेत आहेत, आणि ते सुद्धा प्रत्यक्ष एकमेकांना न भेटता.

कम्युनिकेशन ची मिडीयम्स केवढी बदलत गेलीत ना? प्राचीन काळी, कालिदासाने मेघाकडून निरोप धाडला होता… नंतर कबुतराने चिठ्ठी पोहोचवण्याचे दिवस आले, पुढे “डाकिया डाक लाया” म्हणत गावोगाव लोक पोस्टमन ची वाट पाहू लागले, मग तेही दिवस गेले, रंगूनच्या टेलिफोन वरुन पियाशी संपर्क होऊ लागला, फास्ट मॉडर्न युगात मोबाईल आले, एसएमएस आले, आणि आता या नेटवर्किंग साईट्सने सारं जग चौदा इंचांच्या छोट्याश्या स्क्रिन मधे आपल्या जवळ उभं राहिलं…. काही लोक म्हणतात की, पूर्वीच्या पत्रांची गोडी आजच्या या स्क्रॅप्स ना नाही… पण आजही पूर्वीच्याच आतुरतेने काही स्क्रॅप्स ची वाट पाहिली जाते, समोरच्या व्यक्तीच्या एका मेसेज ने गालावरची कळी खुलते आणि लाखो मैलांचं अंतर झुगारुन मैत्री अधिकाअधिक घट्ट होत जाते. संपर्काचे माध्यम बदलले आहे पण मनीच्या भावना मात्र त्याच आहेत. याच भावनांना आणि मित्रत्वाला घट्ट करण्याचे एक साधन म्हणजेच, नेटवर्किंग साईट्स… एक अशी जादुई दुनिया… which you can love it, or hate it, but you can’t ignore it!!!!

So, लवकर लॉग इन करा… तुमचे काही जवळचे लोक तुमची वाट पाहत आहेत… hurry up!!!!

- सुबोध