Friday, January 28, 2011

दरवाजे...


दरवाजे….. 
मोठी अतरंग गोष्ट असते हि…. 
खरच…. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी….

काही दरवाजे…. राकट, कठोर, आक्रस्ताळे…
काही दरवाजे…. फिकट, माफक, मोडकळीला आलेले…
काही दरवाजे…. जुनाट, कळकट्ट, करकरणारे….
काही दरवाजे…. झक्कास, शिसवी लाकडला, पालिश फासलेले…
काही दरवाजे…. भव्य, बलाढ्य, अणकूचीदार खिळ्यांनी मढवलेले….
काही दरवाजे… चोर, छोटूसे, पळवाटांना बिलगणारे….

काही दरवाज्यांना कडी कुलपाने जखडलेलं….
काही दरवाज्यांना कोळीष्ट्कांनी झाकलेलं….
काही दरवाज्यांवर मंगलमूर्ती…..
काही दरवाज्यांवर क्रॉस, टि….
काहीं दरवाज्यांवर लांबच लांब पाट्या….
काही दरवाज्यांवर कायमच आठ्या….

काही दरवाजे… सताड उघडे….
काही दरवाजे…. किलकिले थोडॆ….
काही दरवाजे मात्र… अवघडलेले….

प्रत्येक दरवाज्यामागे दडलेली असते एक गोष्ट….
निट कान लावून बसलात तर ऐकू येईल स्पष्ट….

दरवाजे….
आतल्यांना आत आणि बाहेरच्यांना बाहेर रोखणारे….
भावनांना बांध घालणारे….
या कानाची गोष्ट त्या कानाला कळू न देणारे….
प्रायव्हसी जपणारे….
लाज राखणारे…..
दरवाजे….

- सुबोध,

२९ जानेवारी २०११

Thursday, January 13, 2011

थोडं हातचं राखून ठेवावं….


नेहमीच जरा सांभाळावं, थोडं हातचं राखून ठेवावं…
प्रत्येक ठिकाणी धसमुसळेपणा नको,
भावनांची गर्दी नको…
स्पष्टवक्तेपणा नको,
गुंतत जाणं तर नकोच नको….
तेवढ्यापुरतच वागावं,
मनाला आपल्या समजवावं…. थोडं हातचं राखून ठेवावं….

जेवणात मिठ जास्तं झालं तर बिघडते ना चव?
बाजारात माल जास्त आला तर उतरतो ना भाव?
मग emotions चं पण तसच तर असतं,
मनापासून काही सांगाल तर आगाऊ वाटाल,

खुप प्रेम दाखवाल तर over possessive दिसाल….
त्यापेक्षा गप्प बसावं, मनाला आपल्या समजवावं….
थोडं हातचं राखून ठेवावं….

तुमच्या आनंदाने दुस-याला खरच आनंद होतो का?
तुमच्या दुःखात खरच समोरचा रडतो का?
मग तुमच्या भावना कश्या पोहोचतील समोरच्यापर्यंत?
आणि त्या पोहोचाव्या हा अट्टाहास तरी का करावा?
माणसाने emotional च नसावं, एकदम रुक्ष, स्थितप्रज्ञ दिसावं,
भावनांच्या बाबतीत, थोडं हातच राखूनच ठेवावं….

हो… हातचं राखूनच ठेवावं….
नाहितर मग लोक दुखावतात…
चटकन रागावतात…..
समोरासमोर भेटणं टाळतात….
दूरूनच पाहून रस्ता बदलतात…..
अगदी “जवळचे” वाटणारेही कायमचे दुरावतात….
क्षणार्धात आपल्याला SHIFT + DELETE करुन टाकतात….

माणूस हा कळपाने राहणारा प्राणी ना? मग तो एकटा पडला तर काय होईल?
छे…. असा धोका का पत्करायचा? भावूकपणा का जपायचा?
भावनांना या जगात काडीचीही किम्मत नाही…..
Emotions ना इथे कुत्रं सुद्धा भिक घालत नाही…..

म्हणून विनवतोय, मनापसून, अगदी आतून….
पुन्हा भावूक होऊन गाढवपणा करतोय….
एवढं मोठं लेक्चर देऊन स्वतः मात्र वाहतोय…..
पण, नेहमीच जरा सांभाळावं,
थोडं हातचं राखून ठेवावं…
मनातलं मनातच खोल कुठेतरी दडवावं….
मधाळ बोलावं आणि खोटं हास्य मिरवावं…..
ह्या जगात थोडं हातचं राखूनच ठेवावं…. या जगात थोडं हातचं राखूनच ठेवावं…..
- सुबोध,
१३ जानेवारी, २०११

Monday, January 10, 2011

ये फिक्सिंग है बॉस!!!


  “ये सेट हे बॉस… ऑलरेडी फिक्स आहेत गोष्टी…. सेटींग करुन ठेव ना…. जॅक लागलाय ना नीट? एक्का चिकटवला? ऑल डन?” विचीत्र वाटताएत ना हि वाक्य? अचानक हे काय सुरु झालय असं वाटतय ना? बरोब्बर! असच वाटलं सगळ्यांना जेंव्हा काही दिवसांपूर्वी अचानाक क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या हिमनगाचं टोक पुन्हा दिसू लागलं. या वेळेस पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंना मॅच फिक्सिंग प्रकरणात रंगेहाथ पकडण्यात आलं. पेपरात आणि टिव्ही न्यूज चॅनल्सवर सनसनीखेज बातम्या चालवल्या गेल्या, पाकिस्तानी खेळाडूंना दूषणं दिली गेली. लागोलाग खेळाडूंवर कारवाईही झाली आणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी फिक्सिंग या विषयावर चर्चा सुरु झाली. अनेक वर्षांपूर्वी असाच मॅच फिक्सिंगचा राक्षस अवतरला होता आणि ज्यात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबरच भारतीय खेळाडूही गिळंकृत झाले होते. मोहंम्मद अझरुद्दिन, नयन मोंगिया, अजय जाडेजा यासारखे त्यावेळेचे भारताचे आघाडीचे खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्याचं उघड झालं आणि भारतीय क्रिडा रसिकांना धक्का बसला. आपण पाहत असलेल्या प्रत्येक मॅचचा निकाल आधीच ठरलेला आहे आणि खेळाडू हे फक्त कळसुत्री बाहुल्यांसारखे मैदानात वावरत आहेत याची जाणीव जगाला झाली. आपण ज्या खेळावर जीवापाड प्रेम करतो, खेळातली उत्सुकता आपल्या अंगावर रोमांच उभे करते आणि जो खेळ हा आपला जणू धर्म झालेला आहे अश्या हृदयाशी अत्यंत जवळ असलेल्या गोष्टीशी प्रतारणा होणे म्हणजे काय हे भारतीयांना कळले. भारतीय रसिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि खेळाडूंच्या घरावर हल्ले झाले, मोर्चे निघाले, पुतळे जाळले गेले. काही दिवस गदारोळ माजून नंतर पुन्हा सगळं शांत झालं.
    पण नीट विचार केला तर फिक्सिंग म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीच्या निकालाची आधीच खात्री करुन घेणे, निकाल ठरवून टाकणे आणि तो ठरावा यासाठी आवश्यक ते बदल करणे किंवा करवून घेणे…. माणसाला उत्सुकता ताणली जायला निश्चितच आवडते, पण त्याच बरोबर प्रत्येक गोष्टीत यशाची शाश्वती त्याला गरजेची वाटते. म्हणूनच तर भविष्याचा वेध घेऊन आपण भावी काळात आपल्यापुढे काय मांडून ठेवले आहे याचा अंदाज घेतो. समजा त्याच वेळी आपल्याला आपलं भविष्य बदलता आलं तर? क्रिकेट मॅच च भविष्य ठरवणं हा क्रिकेट फिक्सिंगचा खरा अर्थ झाला. या फिक्सिंग इंडस्ट्रीचा करोडो डॉलर्सचा व्यवहार चालतो. मॅचेसवर बेटींग करणा-या लोकांनी जिंकण्यासाठी घेतलेलं ह एक पाऊल असतं. यात बुकी, बेटींग करणारे धनदांडगे, माफिया आणि खेळाडू सगळेच गुंतलेले असतात. आपल्या नैसर्गिक खेळाचं प्रदर्शन न करता कुवतीपेक्षा कमी performance देणं आणि मॅच हरणं हे फिक्सिंग मधे हातोहात घडतं. त्या बदल्यात खेळाडूंना प्रचंड पैसे मिळतात. अति पैश्याच्या हव्यासातूनच खेळाडू असल्या मार्गाने जातात.
   मला प्रश्न असा पडतो कि क्रिकेट किंवा फुटबॉल सारख्या खेळात आत्ताच्या काळात, पैसा आणि प्रसिद्धी आधीच खुप असताना खरच या घाणेरड्या पैश्यांची गरज असते का? केवळ अति पैश्याच्या हव्यासापोटी ज्या रसिकांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना फसवायला या हावरटांचं मन धजावतच कसं? बरं फिक्सिंग हा प्रकार फक्त क्रिकेट मधेच होतो असं नाही, तर रियॅलिटी शोज, अवॉर्ड फंक्शन्स, सरकारी मानाचे पुरस्कार, इतकच कशाला परिक्षेतही होतच की. आपण देवालाही नवस बोलून, नैवेद्य आणि इतर प्रलोभनांचं अमिष दाखवून सेट करायला बघतो. त्यामुळे इतर कुणाला दोष देण्यापेक्षा आपण फिक्सिंग प्रकरणात दोष आपल्याच मानसिकतेला द्यायला हवा. आपल्याच भ्रष्टाचारी विचारांमुळे आज हे फिक्सिंग प्रकरण वाढलं आहे. आपणच जर भविष्यातल्या अनोळखी चढ उतारांकडे उतुस्कतेने पाहिलं आणि येणा-या वळणांना आनंदाने सामोरे जाऊ लागलो तर कुठलिही गोष्ट फिक्स करायची आपल्याला गरजच पडणार नाही. ख-या अर्थाने निर्भेळ आयुष्य आपण जगू शकू. आणि कुणाच्याही तालावर न नाचता स्वतःच्या नैसर्गिक कुवतीवर जग चालेल. फिक्सिंग मैदानावर होत नसतं, आपल्या मनात, आपल्या डोक्यात होत असतं त्याला आळा आपणच घालू शकतो.

Tuesday, January 4, 2011

जित्याची खोड....

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात..... 
अगदी करेक्ट आहे ते.... काही काही सवयी आपल्या आयुष्याचा इतका भाग बनून गेलेल्या असतात कि, कितीही टाळू म्हटलं, अमुक एक करायचं नाही म्हटलं तरी होऊन जातं.... खोड म्हणतात ती हिच.... होतेच ती हातून... किंवा मनाकडून?

फार वर्षांच्या सवयी असतात त्या... तुटता तुटत नाहित.... नकळत माती खाऊन जातोच आपण... 

कितीही मोठे झालो तरी, ताई आणि मी घराचे जिने चढताना रेस लावतोच, अजूनही.... आणि दाराजवळ आल्या आल्या मोठ्याने आईला हाक मारणंही तसच.... शाळेत असताना असायचं तसं....
मी लहान असताना दर दोन मिनीटांनी स्वतःच्या गालावर बोट नाचवत बसायचो, खुप ओरडा, बोलणी खाल्लीत त्यावरुन... पण ती सवय सुटेचना....  मोठा होता होता ती सवय विरळ होत गेली... पण आजही कधीतरी अचानक मला लक्षात येतं कि " अरे, मी तर माझ्या गालावर बोटं नाचवतोय, आत्ता, या क्षणी..."
कुठल्याही वस्तूला पाय लागताच नमस्कार करण्याची सवयही तशीच.... मॅनर्स म्हणून चांगली वाटते, पण इतकी सवय झालेली असते कधी कधी, कि दिवसातून १०० वेळा नुसतं, निरर्थक पाया पडणं होतं... 
वर्षानुवर्ष बाईकला किक मारण्याची सवयही, तशीच... आणि मग बटण स्टार्ट सुरु असलं तरी उगाच बाईकला लाथा मारत बसणं.... मग रियलाईझ झाल्यावर जीभ चावणं....
बाईक चालवताना तर कित्येकदा मन भरकटलेलं असतं कुठे तरी.... हात आणि पाय, शरीर सांभाळत बाईक चालवत असतात, पण ठराविक टर्न जवळ आल्यावर आपोआप लेफ्टचा सिग्नल दिला जातो... सवयीने....
वरळी नाक्यावरच्या अनोळखी "चेतन" ला मारलेली ओळखीची हाकही तशीच, सवयीची....
आणि ठेच लागल्यावर किंवा मित्र, (किंवा सॉल्लीड मुलगीही) दिसल्यावर तोंडातून येणारी शिवीही, तशीच सवयीची.....
आपल्या प्रत्येक श्वासात एक सवय लागलेली असते आपल्याला, अमुक पद्धतीने बोलायची, अमुक पद्धतीने हसायची, रिएक्ट व्हायची, चालायची.... अगदी श्वास घ्यायची सुद्ध.....

पण हे टाळायला हवं.... सवय लागणं टाळायला हवं.... सवयची मग खोड होते... आणि ती सुटता सुटत नाही.... आयुष्याचा भाग बनून जाते.... असा भाग, जो नकोसा वाटत असतो, पण टाळताच येत नाही....
आणि माणसांची सवय लागणं तर सगळ्यात भयानक....  प्रचंड वेदना देणारी....  इतर सवयी शिक्षा करुन, हातावर फटके मारुन, ओरडून, चटके देऊन, सोडवता येतात.....
पण..... माणसाची सवय कशी सुटणार????कितीही कोणी जबरदस्ती केली तरी?????
ती लागतानाच अशी घट्ट बिलगते कि सुटता सुटत नाही.... कितीही चटके बसले तरी.....
टाळायला हवी.... हि सवय.... टाळायला हवी....

- सुबोध
४ जानेवारी २०११