Thursday, January 13, 2011

थोडं हातचं राखून ठेवावं….


नेहमीच जरा सांभाळावं, थोडं हातचं राखून ठेवावं…
प्रत्येक ठिकाणी धसमुसळेपणा नको,
भावनांची गर्दी नको…
स्पष्टवक्तेपणा नको,
गुंतत जाणं तर नकोच नको….
तेवढ्यापुरतच वागावं,
मनाला आपल्या समजवावं…. थोडं हातचं राखून ठेवावं….

जेवणात मिठ जास्तं झालं तर बिघडते ना चव?
बाजारात माल जास्त आला तर उतरतो ना भाव?
मग emotions चं पण तसच तर असतं,
मनापासून काही सांगाल तर आगाऊ वाटाल,

खुप प्रेम दाखवाल तर over possessive दिसाल….
त्यापेक्षा गप्प बसावं, मनाला आपल्या समजवावं….
थोडं हातचं राखून ठेवावं….

तुमच्या आनंदाने दुस-याला खरच आनंद होतो का?
तुमच्या दुःखात खरच समोरचा रडतो का?
मग तुमच्या भावना कश्या पोहोचतील समोरच्यापर्यंत?
आणि त्या पोहोचाव्या हा अट्टाहास तरी का करावा?
माणसाने emotional च नसावं, एकदम रुक्ष, स्थितप्रज्ञ दिसावं,
भावनांच्या बाबतीत, थोडं हातच राखूनच ठेवावं….

हो… हातचं राखूनच ठेवावं….
नाहितर मग लोक दुखावतात…
चटकन रागावतात…..
समोरासमोर भेटणं टाळतात….
दूरूनच पाहून रस्ता बदलतात…..
अगदी “जवळचे” वाटणारेही कायमचे दुरावतात….
क्षणार्धात आपल्याला SHIFT + DELETE करुन टाकतात….

माणूस हा कळपाने राहणारा प्राणी ना? मग तो एकटा पडला तर काय होईल?
छे…. असा धोका का पत्करायचा? भावूकपणा का जपायचा?
भावनांना या जगात काडीचीही किम्मत नाही…..
Emotions ना इथे कुत्रं सुद्धा भिक घालत नाही…..

म्हणून विनवतोय, मनापसून, अगदी आतून….
पुन्हा भावूक होऊन गाढवपणा करतोय….
एवढं मोठं लेक्चर देऊन स्वतः मात्र वाहतोय…..
पण, नेहमीच जरा सांभाळावं,
थोडं हातचं राखून ठेवावं…
मनातलं मनातच खोल कुठेतरी दडवावं….
मधाळ बोलावं आणि खोटं हास्य मिरवावं…..
ह्या जगात थोडं हातचं राखूनच ठेवावं…. या जगात थोडं हातचं राखूनच ठेवावं…..
- सुबोध,
१३ जानेवारी, २०११

No comments:

Post a Comment