Tuesday, January 4, 2011

जित्याची खोड....

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात..... 
अगदी करेक्ट आहे ते.... काही काही सवयी आपल्या आयुष्याचा इतका भाग बनून गेलेल्या असतात कि, कितीही टाळू म्हटलं, अमुक एक करायचं नाही म्हटलं तरी होऊन जातं.... खोड म्हणतात ती हिच.... होतेच ती हातून... किंवा मनाकडून?

फार वर्षांच्या सवयी असतात त्या... तुटता तुटत नाहित.... नकळत माती खाऊन जातोच आपण... 

कितीही मोठे झालो तरी, ताई आणि मी घराचे जिने चढताना रेस लावतोच, अजूनही.... आणि दाराजवळ आल्या आल्या मोठ्याने आईला हाक मारणंही तसच.... शाळेत असताना असायचं तसं....
मी लहान असताना दर दोन मिनीटांनी स्वतःच्या गालावर बोट नाचवत बसायचो, खुप ओरडा, बोलणी खाल्लीत त्यावरुन... पण ती सवय सुटेचना....  मोठा होता होता ती सवय विरळ होत गेली... पण आजही कधीतरी अचानक मला लक्षात येतं कि " अरे, मी तर माझ्या गालावर बोटं नाचवतोय, आत्ता, या क्षणी..."
कुठल्याही वस्तूला पाय लागताच नमस्कार करण्याची सवयही तशीच.... मॅनर्स म्हणून चांगली वाटते, पण इतकी सवय झालेली असते कधी कधी, कि दिवसातून १०० वेळा नुसतं, निरर्थक पाया पडणं होतं... 
वर्षानुवर्ष बाईकला किक मारण्याची सवयही, तशीच... आणि मग बटण स्टार्ट सुरु असलं तरी उगाच बाईकला लाथा मारत बसणं.... मग रियलाईझ झाल्यावर जीभ चावणं....
बाईक चालवताना तर कित्येकदा मन भरकटलेलं असतं कुठे तरी.... हात आणि पाय, शरीर सांभाळत बाईक चालवत असतात, पण ठराविक टर्न जवळ आल्यावर आपोआप लेफ्टचा सिग्नल दिला जातो... सवयीने....
वरळी नाक्यावरच्या अनोळखी "चेतन" ला मारलेली ओळखीची हाकही तशीच, सवयीची....
आणि ठेच लागल्यावर किंवा मित्र, (किंवा सॉल्लीड मुलगीही) दिसल्यावर तोंडातून येणारी शिवीही, तशीच सवयीची.....
आपल्या प्रत्येक श्वासात एक सवय लागलेली असते आपल्याला, अमुक पद्धतीने बोलायची, अमुक पद्धतीने हसायची, रिएक्ट व्हायची, चालायची.... अगदी श्वास घ्यायची सुद्ध.....

पण हे टाळायला हवं.... सवय लागणं टाळायला हवं.... सवयची मग खोड होते... आणि ती सुटता सुटत नाही.... आयुष्याचा भाग बनून जाते.... असा भाग, जो नकोसा वाटत असतो, पण टाळताच येत नाही....
आणि माणसांची सवय लागणं तर सगळ्यात भयानक....  प्रचंड वेदना देणारी....  इतर सवयी शिक्षा करुन, हातावर फटके मारुन, ओरडून, चटके देऊन, सोडवता येतात.....
पण..... माणसाची सवय कशी सुटणार????कितीही कोणी जबरदस्ती केली तरी?????
ती लागतानाच अशी घट्ट बिलगते कि सुटता सुटत नाही.... कितीही चटके बसले तरी.....
टाळायला हवी.... हि सवय.... टाळायला हवी....

- सुबोध
४ जानेवारी २०११

No comments:

Post a Comment