Wednesday, December 22, 2010

उद्रेक

एका इंग्रजी सिनेमातला भव्य प्रसंग, हजारो-लाखो गाड्या रस्त्यावर स्तब्ध उभ्या, रस्ता कोंडून टाकलेला. नजर पोहोचेपर्यंत गाड्याच गाड्यांचं साम्राज्य आणि त्यांच्या ब्रेक्सच्या लाल दिव्यांची लुकलुक. याच्या सोबतीला तुफान पाऊस आणि वादळ. लाखो लोकांचे होणारे हाल आणि जनता बेहाल. शहरावर आलेलं एक भयाण संकट.

ओळखीचा वाटला ना प्रसंग? बरोब्बर, २६ जुलै या ऐतिहासिक तारखेशी जोडलं गेलेलंच वर्णन आहे हे. मुंबईकरांनी त्यांच्या उभ्या हयातीत पहिल्यांदा अनुभव घेतला होता अश्या भिषण नैसर्गिक आपत्तीचा. अनेक जण मृत्यूमुखी पडले, अनेकांची घरंदारं वाहून गेली. अनेक जणं बेघर झाले. मुंबईचं सगळं infrastructure च कोलमडून गेलं. त्यानंतर या आपत्तीमागच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला, रिपोर्ट्स बनवले गेले, चर्चासत्र झडली, निसर्गाच्या कोपावर ठपका ठेवण्यात आला आणि सोबतीला मिठी नदीला दावणीला बांधण्यात आलं. पण खरं पाहता निसर्गाने आपल्याला दिलेला तो सावधानतेचा इशारा होता असच वाटतं. मुंबई हि सात बेटांची मिळून बनलेली नगरी. सात बेटं जोडून त्यात देशभरातून आलेले लोक राहू लागले. इथे एक नवी संस्कृती उदयाला आली आणि या मनोहारी, अद्भूत आणि सा-यांना हेवा, आकर्षण वाटेल अश्या शहराचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात लाखो लोकांना आपल्यात सामावून घेणा-या या नगरीचा आकार हळू हळू मोठा होत गेला. आधी माहिम, वांद्रे पर्यंतच असलेलं हे शहर पुढे गोरेगाव, बोरीवली करत आता थेट दहिसर पुढे जाऊन पोहोचलय (जिल्हा वेगळा, पण अगदी विरार पर्यंतचा भाग हा आता मुंबईतच गणला जातो) गायीचा आकार घेण्याच्या नादात फुग फुग फुगणा-या बेडकी सारखी आता तिची अवस्था झालेली आहे, त्याच गोष्टीप्रमाणे एक दिवस मात्र हे शहर फुटेल कि काय अशी भिती मनात आल्याशिवाय राहत नाही. पायाभूत सोयी सुविधांवर तर इतका ताण पडतो आहे. ब्रिटीश काळात बांधलेली हॉस्पीटल्स, रस्ते, रेल्वे स्टेशन्स यांचं आपण आजही कौतुक करतो ते त्याच्या भव्यतेमुळे. त्या काळातही भविष्याचा विचार करुन, वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन मजबूत पायाभूत सोयी सुविधा ब्रिटीशांनी तयार केल्या आणि त्यामुळेच आजही त्या वास्तूंचा आपल्याला वापर करता येतो. पण मुंबईत वाढत जाणारी माणसांची गर्दी, त्यांच्या दैनंदिन गरजा, आणि त्याचा infrastructure वर पडणारा ताण पाहता, मुबई अजून किती वर्ष हे सगळं सहन करु शकेल हा प्रश्नच पडतो.

टंचाई हा शब्द तर मुंबईकरांच्या अंगवळणीच पडलेला आहे. पाण्याची टंचाई, जीवनावश्यक पदार्थांची टंचाई, दूधाची टंचाई, वीजेची टंचाई, जागेची टंचाई…. किती नावं घ्यायची? बरं या सगळ्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला गेल्यास सरळ सरकारवर खापर फोडून आपण मोकळे. सरकारने टंचाईवर उपाय करायला हवेत. “पाणी टंचाई जाणवतेय ना? मग नवीन तलाव बांधा ना, नवीन पाईपलाईन टाका, झोपा कसल्या काढताय?” इति, सामान्य नागरिक. पण आपल्याला महानगरपालिका इतकं स्वच्छ पाणी घरापर्यंत आणून देते, तेही दरोरोज, त्याचा आपल्याला आदर आहे का? किंमत आहे का? गावात मैलोंनमैल डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणावं लागतं, त्यातूनही ते पाणी निर्मळ असेल याची शाश्वती नाही. त्या मानाने मुंबईकरांना फारच जास्त सुख मिळते आहे. आणि आपण त्याचा गैरवापर करतो. पाण्याची आप्ण फारच उधळपट्टी करतो. दरोरोज आपल्याला माणशी साठ ते ऐशी लिटर पाणी दैनंदिन गरजेला लागतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या कित्येक पट अधिक पाणी आपण रोज उपसतो. रोज बादल्यांमधे पाणी भरुन ठेवतो आणि दुस-या दिवशी तेच पाणी जुनं झालं म्हणून, शिळं झालं म्हणून ओतून टाकतो. एखादा नळ गळत असला तर तो ताबडतोब दुरुस्त करुन घेण्यात आपण दिरंगाई करतो आणि याच नळातून वर्षाकाठी पंधरा हजार लिटर पाणी थेंबांच्या स्वरुपात वाहून जातय याकडे दुर्लक्ष करतो. मुंबईला पावसाच्म इतकं पाणी मिळतं, पण आपण रेन वॉटर हार्वेस्टींगचा पर्याय अजूनही आचरणात आणलेला दिसत नाही. एवढ्या विशाल वाढलेल्या शहराला प्रशासनाने पाणी पुरवठा करणं गरजेचच आहे, पण आपण स्वतःही आपल्या गरजा आटोक्यात ठेवणं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सहाय्याने Water independent society ची निर्मिती करणं आवश्यक आहे.

जो प्रश्न पाण्याचा तोच वीजेचा, वीजेचा वापरही अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त करतो. गरज नसताना दिवे बंद करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे यासारख्या साध्या सुचनांवर अमल करत नाही. याबाबतीत तरुण पिढीची मतही भिन्न आहेत, काहिंच्या मते वीजेचा वापर हा काटेकोरपणेच व्हायला हवा, त्यासाठी अश्या उपकरणांचा शोध लागायला हवा ज्यात वीजबचत जास्त होईल आणि कामही वेगात पूर्ण होईल. तर याच्या अगदी विरिद्ध मत असलेलेही आहेतच कि, त्यांच्या मते, वीजेची निर्मीती हा एक उद्योग आहे. त्यासाठी मोठमोठाले प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सामान्य माणसाला वीज वापरल्यानंतर त्याचं शुल्क आकारण्यात येतं. वीजबील आम्ही नियमीत भरतो. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण विकत घेतो, त्याच प्रामाणे आपण वीज विकत घेतो. मग त्याचा वापर आम्ही काटेकोरपणे का करावा? मागणी तसा पुरवठा करणं हि वीजनिर्मीती करणा-या कंपनीचं काम आहे. ते त्यानी करावं. एकूणातच पायाभूत सोयी सुविधा वाढवणं हि जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी ती उचलावी. त्यासाठी जनतेला वेठीस धरु नये.

जशी माणसं अनेक तश्या त्यांच्या प्रतिक्रिया, विचारही भिन्न, पण एक गोष्ट मात्र नक्की कि आपण आपल्याला मिळत असलेल्या सोयीसुविधांचा नीट, काटेकोरपणे वापर करावा, नासाडी करु नये। लोकसंख्या वाढ किंवा मुंबईत येणारे लोंढे आटोक्यात आणण्यात यश आले तर फारच मोठा ताण कमी होईल हे नक्की, परंतु आपण जर पायाभूत सोयी सुविधांना पर्याय शोधून आणि सार्वजनिक सोयीसुविधांचा योग्य वापर करण्याची सवय आपल्या घरापासूनच लावली, तर भविष्यात टंचाई ची भिती आपल्याला उरणार नाही. आणि भविष्यात होणा-या मोठ्या उद्रेकापासून आपण वाचू शकू. अन्यथा Infrastructure कोलमडून मुंबई नगरीवर संकटं येणं निश्चित आहे.

- सुबोध

1 comment:

  1. khanta ahe ki loka ashi wagat nahit... pan sunder lekh ahe...
    me yevadhach sangen lokanna "ACT NOW"... nahin tar paristhiti hata baher jayil...-sarvesh shinde

    ReplyDelete