Wednesday, December 22, 2010

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, किती वास्तव?

ये मुंबई नगरिया है देख बबुआ… सोने चांदीकी डगरिया है देख बबुआ…..

मुंबई… स्वप्नांचं शहर…. करोडो माणसांच्या पोटाची खळगी भरणारी जादुई दुनिया... इथे कोणीही यावं… स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटावं आणि या गर्दीने भरलेल्या दुनियेत स्वतःचं स्थान मिळवावं…. हि अशी दुनिया ज्यात कुणीही कधी उपाशी मरत नाही… इच्छा असणा-या प्रत्येकाला इथे त्याचा रस्ता सापडतोच…. म्हणूनच भारतातल्या सगळ्या ठिकाणांहून माणसं या शहराकडे ओढली जातात, आणि हे शहर आपले विशाल बाहू पसरुन सगळ्यांना आपल्यात सामावून घेत मोठं मोठं होत जातं….

महाराष्ट्राची राजधानी असलेलं हे शहर नानाविविध प्रकारच्या, जातीच्या, पंथांच्या आणि विचारशैलींच्या माणसांनी बनलेलं आहे. या शहराला स्वतःचं असं एक अस्तित्व आहे, संस्कृती आहे जी या सगळ्या प्रकारच्या लोकांनी या शहरात एकत्र राहिल्यामुळे विकसित झालेली आहे. पण, १९६० साली १०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तयार झालेल्या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची नाळ आता काळाच्या ओघात या मुंबईपासून तुटू लागलेली आहे. दरोरोज आपण मुंबई कुणाची? हा प्रश्न विचारतो आणि त्या नंतर सहज विसरुनही जातो. पण झपाट्याने वाढणारी आणि घड्याळाच्या काट्यावर धावणारी हि मुंबई महाराष्ट्रापासून दुरावत चाललेली आहे हे मात्र त्रिवार सत्य आहे….

मुंबई आणि महाराष्ट्र असा भेदाभेद आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो… अगदी रणजी सामन्यांपासून मोबाईल कंपन्यांच्या रोमिंगसेवे पर्यंत आणि सरकारी योजनांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत…. आणि या सगळ्याला जितके बाहेरुन येणारे लोंढे आणि राजकिय माफिया कारणीभूत आहेत तितकेच आपण मुंबईकरही आहोत. मुळात हा भेदाभेद आपल्या मनात आणि आपल्या डोक्यात इतक्या खोलवर रुतलेला आहे कि तो आपण जाणूनबुजून करतो आहोत असंही म्हणू शकत नाही. मुंबईकर माणूस त्याला मिळत असलेल्या सोयी सुविधांमुळे, ग्लॅमरमुळे, जीवनशैलीमुळे स्वतःला नेहमीच उर्वरीत महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षा श्रेष्ठ समजतो. ग्रामीण भागातल्या प्रश्नांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी सामान्य मुंबईकर अनिभिज्ञ असतो. ग्रामीण भागात काय चाललय हे माहित असणही त्याला महत्वाचं वाटत नाही… स्वतःच्याच विश्वात तो इतका रममाण झालेला आहे कि मुंबई आणि मुंबईप्रेम सोडूनही आपलं, आपल्या हक्काचं जग आहे याकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि हि स्थीती निर्माण व्हायला अनेक कारणं आहेत, .

सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे आत्मकेंद्रीत दृष्टीकोन. मुंबईकर माणसांचा मुळातला दृष्टिकोनच इतका आत्मकेंद्रीत आहे की, आपण, आपलं घर, आपली सोसायटी, आपला परिसर, आपली मुंबई या पलिकडे तो जातच नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नांशी तो कधीच एकरुप होत नाही. साधंचं उदाहरण द्यायचं म्हणजे, मुंबईत एक तास जरी वीज गेली तरी सगळीकडे बोंबाबोंब होते, लगेच न्युज चॅनल्सवर “ब्रेकिंग न्यूज” झळकू लागते, ‘मुंबई मे चली गयी बिजली – करोडो लोग बेहाल’….. पण सारा महाराष्ट्र आज लोडशेडींगचे चटके सहन करतोय याविरोधात मुंबईतले लोक कधी पेटून उठत नाहीत, कारण मुळात ते स्वतःला महाराष्ट्राचा भागच समजत नाहित. विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्येच्या बातम्या दरोरोज मुंबईच्या पेपरात येतात, पण कोप-यात… आणि आपणही तो पेपर वाचून तसाच कुठल्यातरी कोप-यात टाकून देतो…. कारण विदर्भात आत्महत्या केलेला शेतकरी आपला नातलग नसतो…. त्याच्या मृत्यूने आपल्या आयुष्यात फरक पडलेला नसतो…. पण आपण हा विचार करतो का, कि हाच शेतकरी रोज मरमर मरुन… रक्ताचं पाणी करुन जेंव्हा पिक काढतो… तेंव्हाच मुंबईत आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं…. पण तरीही आपल्याला या ग्रामिण महाराष्ट्राची माया वाटत नाही. प्रसारमाध्यमांचं म्हणजेच न्यूज मिडीयाचं शहरीकरण (urbanization) इतकं झालेलं आहे कि ग्रामिण भागातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नाहिये. न्यूज चॅनल्सही हल्ली टि आर पी च्या मागे धावताहेत, त्यामुळे जाहिरातदारांना सुखावण्यासाठी शहरात घडणा-या बातम्या दाखवण्यावर त्यांचा जास्त जोर असतो. मेट्रो मुंबई सारखी विशेष बातमीपत्र या न्यूज चॅनल्सवर दाखवली जातात पण कोकण दर्शन असा वेगळा दरोरोजचा अर्धा तास राखून ठेवला जात नाही. फयानची झळ जितकी कोकणातल्या माणसाला बसली त्याच्या एक शतांश सुद्धा मुंबईच्या माणसाला जाणवली नाही त्याचं कारण हेच आहे.

मुंबईचे प्रश्न आणि महाराष्ट्राचे प्रश्न हे इतके वेगवेगळे होत चालले आहेत कि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात एक भयंकर दरी निर्माण होत आहे आणि त्यातच आपण मुंबईकरांनी ग्रामीण महाराष्ट्राला, तिथल्या लोकांना, त्यांच्या प्रश्नांना क्षूद्र लेखून आपणापासून दूर लोटलेलं आहे. समाजकारणात आपण रसच घेत नाही, मात्र सगळ्या समस्या सहज सोडवल्या जाव्या म्हणून गप्पा मात्र मारतो, इतरांना दोष देतो. मुंबईत महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत जास्त सहज सोयीसुविधा उपलब्ध असल्याने गावाकडे असलेल्या असुविधा आणि समस्या काय आहेत आणि त्याचा ग्रामीण बांधवांना काय त्रास होतो हे आपण जाणूनच घेऊ इच्छित नाही. गावातून शहरात आलेल्या आपल्या ग्रामीण बांधवाच्या पेहरावापासून ते त्याच्या भाषा शैली बद्दल बहुतांश मुंबईकर चेष्ठेच्या मूड मधे दिसतात. गावरान, घाटी, अशुद्ध, मॅनर्सलेस म्हणून आपल्यापासून वेगळा समजतात. पण या महाराष्ट्राच्याच वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांनी दिलेल्या बलिदानानंतर आज मुंबईला तिचे स्वतंत्र अस्तित्व मिळालेले आहे हे आपण विसरतो.

या सा-यातून सांगायचा उद्देश इतकाच, कि मुंबई आणि महाराष्ट्र माणसांच्याच मनात वेगळा झालेला आहे। जोवर आपण स्वतःला मुंबईकर समजून महाराष्ट्रापासून वेगळे करणे थांबवत नाही तो पर्यंत महाराष्ट्र आणि मुंबई एकमेकांच्या जवळ येणार नाही. आणि जर का आपण स्वतःला श्रेष्ठ आणि मुंबईला आर्थिक वसाहत समजत राहिलो तर एक दिवस या मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहित हे खेदाने सांगावेसे वाटते, तेंव्हा उठा आणि या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून तरी आपण मुंबईकर ख-या अर्थाने महाराष्ट्राचा भाग बनूया आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी होण्यापासून वाचवूया.

- सुबोध

No comments:

Post a Comment